कनिष्ठ महाविद्यालय व शाळांनी २०१९-२० या शैक्षणिक वर्षाचा निकाल तत्काळ कळवावा

मुंबई (प्रतिनिधी)- कोरोनाच्या पार्श्वभूमीवर २०१९-२० या शैक्षणिक वर्षाच्या इ. १ ली ते इ. ९ वी आणि ११ वीच्या परीक्षा होऊ शकल्या नाहीत. सर्वच विद्यार्थ्यांना त्यांच्या मागील गुणांच्या सरासरीनुसार गुण देऊन निकालपत्रक तयार करण्याचा सूचना दिल्या होत्या. त्यानुसार राज्यातील सर्व शाळा व कनिष्ठ महाविद्यालयांनी विद्यार्थ्यांना त्यांचा निकाल तत्काळ कळवावा असे निर्देश महाराष्ट्र राज्य शैक्षणिक संशोधन आणि प्रशिक्षण परिषदेच्या संचालकांनी दिले आहेत. सर्व विभागीय शिक्षण उपसंचालक. जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था प्राथमिक आणि माध्यमिक शिक्षणाधिकारी यांना हे निर्देश देण्यात आले आहेत. इ.९ व इ. ११ वीचे विद्यार्थी संभ्रमात असल्यामुळे परिषदेने हे निर्देश जारी केले आहेत असे समजते.विद्यार्थ्यांना हा निकाल दूरध्वनी, एमएमएस व ऑनलाईन पद्धतीने तत्काळ कळवावा. की ज्यामळे विद्यार्थ्यांमध्ये कोणताही संभ्रम निर्माण न होता त्यांना पुढील वर्षाचा अभ्यास उपलब्ध साहित्याच्या आधारे सुरू करणे शक्य होईल,असे संचालकांनी त्यांच्या निर्देशात म्हटले आहे.