केंद्र सरकारने संपूर्ण देशात ४ मे पासून १७ मे पर्यंत तिसऱ्यांदा लॉकडाऊन वाढविला आहे. पण यावेळी केंद्र सरकारने देशातील सर्वच परिस्थितीचा अंदाज घेत देशातील व राज्यातील अर्थकारण काही प्रमाणात सुरू करण्यासाठी संबंधित राज्यांच्या आलेल्या विविध सूचनांचा विचार करून काही अटीशर्तीसह लॉकडाऊनमध्ये काही सवलती देण्याची घोषणा केली. तसेच केंद्र सरकारच्या आरोग्य मंत्रालयाने देशातील सर्व जिल्ह्यांची विभागाची त्या त्या जिल्ह्यात सापडलेल्या कोरोनाच्या रुग्णांनुसार रेड, ऑरेंज व ग्रीन या तीन गटात समावेश केला. त्यानुसार जिल्हावार यादी घोषीत केली. _ त्यानुसार महाराष्ट्रातील अर्थकारणाला चालना देण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनीही झोननुसार विविध सवलती जाहीर केल्या. या सवलती जाहीर केल्यानंतर ग्रीन झोनमधील लोकांना सर्वसामान्य जीवन जगता येणार आहे पण त्यांनाही काही अटी टाकण्यात आल्या. ऑरेंज झोनमध्येही काही सट देण्यात आल्या. रेड झोनमध्ये दोन वर्ग करण्यात आले त्यात कंटेनमेंट झोन वगळून इतर रेड झोनमध्ये विविध सवलती देण्यात आल्या पण याबाबतच संभ्रम निर्माण झाला. तसेच त्याची अंमलबजावणी करण्याचा निर्णय राज्य सरकारने संबंधित जिल्हा आपत्ती व्यवस्थापन समितीला दिले __ तिन्ही झोनमध्ये शाळा, महाविद्यालये,मॉल, सलून, पार्लर, स्पा तसेच अन्य काही गोष्टींना प्रतिबंधित करण्यात आल्या आहेत. तसेच तिन्ही झोनमध्ये दारुच्या दुकानांना परवानगी देण्यात आली आहे. तसेच राज्यात अडकलेले इतर राज्यातील मजूरांनाही आपापल्या राज्यात जाण्यासाठी परवानगी देण्यात आली. त्यामुळे राज्यातील अनेक जिल्ह्यांचे प्रशासन या लोकांसाठी मोठ्या प्रमाणात राबत होती. त्यांचीही सुटका होऊ शकेल. तसेच या लॉकडाऊनमध्ये जिल्ह्यांच्या सीमा बंदच ठेवण्यात आल्या आहेत. गेले जवळपास ४० दिवस देशातील सर्वच अर्थकारण थांबलेले असल्यामुळक सर्वच राज्यांच्या तिजोरीत खडखडाट निर्माण झाला आहे तसेच उद्योगधंदे बंद असल्यामुळे त्यावर अवलंबून असलेल्या विविध उद्योगावरही त्याचा परिणाम झाला आहे. मजूर, हातावर पोट असणारे लोक, शेतकरी यांच्या जगण्यावर मोठा परिणाम झाला. तसेच जीवनावश्यक वस्तू, भाजीपाला, फळे-फळावळे, औषध इ. मिळण्याच्या त्रासातून सुटका देण्यासाठी सरकारने ही सूट दिली आहे पण राज्यातील जनतेने सरकारने दिलेले सर्व नियम पाळून त्याचा वापर केला पाहिजे तरच राज्यातील कोरोना आटोक्यात येईल अन्यथा होणारा विस्फोट राज्याला कुठे नेईल याचा विचारच न केलेला बरा असे वाटते. _ म्हणूनच सोशल डिस्टन्सिंगचे पाळन करून आपण कोरोनाला रोखण्याचा निर्धार जनतेने करावा असे सांगावेसे वाटते.
संपादकीय..... जनतेने नेमके करायचे काय....